बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर कोविड रूग्णांना शासनाच्या निकषानुसार खाजगी रुग्णालयांनी बेड उपलब्ध करून न दिल्याने ते नाराज आहेत. दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी शुक्रवारी येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
आरोग्यमंत्री म्हणाले की, एसएस रुग्णालयाने वास्तविक क्षमतेच्या तुलनेत फक्त ५४ बेड उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच ८५० बेडची क्षमता असलेल्या बापूजी शिक्षण रुग्णालयाने केवळ ३७ बेड दिले आहेत. तर यावरून असे स्पष्ट होत आहे की खासगी रुग्णालय आणि खासगी महाविद्यालयात अनुक्रमे ५० टक्के आणि ७५ टक्के बेड राखीव नाहीत.
मंत्री म्हणाले, देश वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत असल्याने रुग्णालयांच्या व्यवस्थापनाशी संघर्ष करण्यास सरकार तयार नाही. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे हे खासगी रुग्णालयांचे कर्तव्य आहे. तसेच सरकार हा खर्च उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.