मिरज-म्हैसाळ रस्त्यावर दहा दिवसांत दुसरा अपघात
प्रतिनिधी / मिरज
मिरज – म्हैसाळ रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिकाच सुरू आहे. दहा दिवसांपूर्वी उड्डाणपुलाजवळच कर्नाटक एसटीच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला होता. आज शनिवारी दुपारीही याच ठिकाणी अपघात होऊन आणखी एकजण ठार झाला.
कर्नाटक टेम्पो (के ए -23-ए-479) ची धडक बसून रमेश सहदेव मगदूम ( वय 43 रा. वड्डी ) हे जागीच ठार झाले.
तर पंकज यल्लापा नाईक (वय 23) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. रमेश मगदूम व पंकज नाईक हे दोघे मिरजेतून म्हैसाळ रस्त्याने दुचाकी मोटारसायकल (एम एच 10-जी-7318) वरून वड्डी गावाकडे जात असताना हा अपघात झाला. टेम्पो चालक इराप्पा चौगुले (रा. अथणी) याला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.