बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने मंगळवारी गणेश चतुर्थी उत्सवासाठी सर्व सार्वजनिक प्रतिष्ठान यांना प्रतिबंधित पद्धतीने परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी करण्याच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
गेल्या आठवड्यात, राज्यात कोरोनाची संख्या वाढल्यामुळे सरकारने एका आदेशानुसार, मूर्तीची सार्वजनिक स्थापना करण्यासंदर्भात बंदी घातली होती. सरकारने गणेशोत्सव मंदिर आणि घरेपुरतेच मर्यादित ठेवले होते.
राज्य सरकारने मंगळवारी सुधारित आदेशात गणेश मूर्तीची उंची चार फूट पेक्षा जास्त असू नये. तसेच सार्वजनिक मोकळ्या जागांवर उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. घरात बसविण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीची उंची दोन फूटांपेक्षा जास्त नसावी.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी गणेश उत्सव मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी जसे की रस्ते, पुढचे आवार, सार्वजनिक मैदान इत्यादी आणि कमी सार्वजनिक असलेल्या घरे यामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करता येणार असल्याचे म्हंटले आहे.
सरकारने प्रति वॉर्डात फक्त एक गणेश मंडपाला परवानगी दिली आहे. आणि सार्वजनिक गणेशोत्सव आयोजकांनी एकावेळी 20 हून अधिक लोकांना परवानगी देऊ नये असे म्हंटले आहे. सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमालाही बंदी घातली आहे. खासगी गणेशमूर्ती खरेदी करताना किंवा स्थापित करताना किंवा विहिरींमध्ये मूर्तींचे विसर्जन करताना कोणत्याही सार्वजनिक मिरवणुकीस परवानगी नाही, असे आदेशात नमूद केले आहे.
नागरिकांना घरीच गणेशमूर्तीचे विसर्जन करावे लागेल आणि सार्वजनिक गणेशोत्सव आयोजकांनी परिसरातच मूर्तींचे विसर्जन केले पाहिजे. असे म्हंटले आहे.