प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाची बैठक बी. के. मॉडेल येथे पार पडली. अध्यक्षस्थानी संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील होते. प्रारंभी सचिव उमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सभेचे विषय सहसचिव वामन कुलकर्णी यांनी सादर केले. प्रारंभी सभासद नोंदणी अभियानावर चर्चा होऊन, सभासद का व्हावे, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा सांघिक हित जोपासण्याबरोबरच सभासद नोंदणी अभियान यशस्वी करावे, असे आवाहन एकनाथ पाटील यांनी केले.
राज्यस्तरीय शिक्षक संघाने दिलेल्या निर्देशानुसार विविध उपक्रम संघातर्फे राबविले जातात. त्यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बोध दिवस हा सोहळा 12 जानेवारी ते 23 जानेवारीपर्यंत साजरा केला जातो. मात्र हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता हा कार्यक्रम शनिवार दि. 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता भरतेश हायस्कूलमध्ये घेण्याचे ठरले. तसेच महिला विभागाच्या कामकाजाची रुपरेषा ठरविण्यात आली. बेळगाव शहराबरोबरच इतर तालुक्यातील सर्व शिक्षकांनी हजर रहावे, असेही ठरविले. बैठकीला राज्य सचिव आर. पी. वंटगुडी, महिला विभाग प्रमुख नवीना शेट्टीगार, खजिनदार सुरेश कळ्ळेकर, राजाराम कुडतूरकर, वामन कुलकर्णी, शहराध्यक्ष संजिव कोष्टी, मंजुनाथ गोलिहळ्ळी, उपाध्यक्ष विश्वजीत हसबे, उपाध्यक्षा प्रिया सायनेकर, ग्रामीण विभाग युवराज पाटील, शहर सचिव रवी अंगडी, सुभाष बराटे, मेलगे, पी. ओ. धामणेकर आदी उपस्थित होते.