बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात बाधितांची संख्या वाढत असताना कर्नाटक सरकारने राज्यातील काही परीक्षा रद्द केल्या तर काही परीक्षा खबरदारी घेऊन घेतल्या. यातच कर्नाटक सरकारने सोमवारी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) आयोजित करण्यासाठी मानक कार्यप्रणाली जारी केली असून ती ३० आणि ३१ जुलै रोजी घेतली जाण्याची शक्यता आहे. पण परीक्षा केंद्रे ही कंटेनमेंट झोन अंतर्गत नसावीत आशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत.
घेण्यात येणारी सीईटी परीक्षा ही अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकीय, दंत, होमिओपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार, योग, आर्किटेक्चर आणि कर्नाटकच्या खाजगी विनाअनुदानित व खासगी अनुदानित व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील प्रथम वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरिता असणार आहे.
तसेच कर्नाटकात इतर राज्यांमधून परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन न करता प्रवेश करण्यास अनुमती दिली जाणार आहे. तसेच अशा उमेदवारांसाठी प्रत्येक केंद्रात स्वतंत्र खोल्या उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपायुक्तांना देण्यात आले आहेत.