शिनोळी ग्रामपंचायतीची रास्ता रोको द्वारे मागणी
कार्वे /वार्ताहर :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना rt-pcr टेस्ट रिपोर्ट बंधनकारक केला आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील शिनोळी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
चंदगड तालुक्यातील प्रामुख्याने पूर्व भागातील नागरिक हे प्रामुख्याने बेळगावशी संबंधित आहेत. येथील सर्वच सेवा बेळगावशी निगडीत आहेत. मात्र कर्नाटक शासनाच्या या निर्णयामुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी हा नियम बंद करून चंदगड तालुक्यातून बेळगावमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांना सरळ प्रवेश द्यावा अशी मागणी केली जात आहे. यासाठी शिनोळी बुद्रुक येथील सरपंच नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.
सरपंच नितिन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेळगावचे तहसीलदार श्री कुलकर्णी यांना यावेळी निवेदन दिले. नितीन पाटील यांनी कर्नाटक सरकारचा हा अन्याय असून आदेश तात्काळ मागे घ्यावा. चंदगड तालुक्यातील जनता ही बेळगाववर अवलंबून असते. येथील सर्व व्यवहार बेळगावशी निगडीत असतात. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करावा. अशी मागणी केली. यावेळी प्रताप सूर्यवंशी, रघुनाथ गुडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार कुलकर्णी यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी तुमच्या भावना सरकार दरबारी पोहोचवल्या जातील व लवकरात लवकर हा निर्णय मागे घेण्यात येईल. अशी ग्वाही दिली. यावेळी चंदगड पोलिस व बेळगाव पोलीसा मार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चात भैरू खांडेकर, विनोद पाटील, प्रवीण पाटील, शिवराज जती, अमृत जती, आकाश हुद्दार, युवराज पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुद्रेमनी बस का सुरू? उपस्थितांचा प्रश्न.
चंदगडमधून कर्नाटकात जायला प्रवेश बंद. आरटीपीसीआर टेस्टिंग चा रिपोर्ट असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश नाही. मग कर्नाटकातून महाराष्ट्र हद्दीतून कुद्रेमनीला बस कशी सुरु आहे. असा प्रश्न उपस्थित नागरिकांतून विचारला जात होता. आम्हाला प्रवेश नाही तर ही बस सुद्धा बंद करा. अशी मागणी यावेळी केली जात होती.