करचुकवेगिरी करणाऱयांना मुख्यमंत्र्यांचा सज्जड इशारा : पणजीत ’गोवा कर भवन’नचे उदघाटन
प्रतिनिधी /पणजी
प्रत्येक करदात्याने आपला कर वेळीच भरावा. करचुकवेगिरी करणे टाळावे, छापे मारून अटक करण्यासारखी वेळ सरकारवर आणू नका. अजूनही अनेकांना आपण सरकारचा डोळा चुकवून करचुकवेगिरी करू शकेन असे वाटते. परंतु यापुढे ते शक्य होणार नाही. आमचे अधिकारी, कर्मचारी ’ई-वे बिल’ सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सदैव त्यांच्यावर डोळा ठेऊन असतील, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.
सुमारे 19 कोटी रुपये खर्च करून आल्तिनो येथे सुमारे 5400 चौ. मी. जागेत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अतिभव्य अशा गोवा राज्य कर भवन इमारतीचे उद्घाटन काल शुक्रवारी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, मुख्य सचिव परिमल राय, प्रधान अर्थसचिव पुनित कुमार गोयल, जीएसटी आयुक्त हेमंत कुमार यांची त्यावेळी उपस्थिती होती.
कर चुकविणाऱयांना अटक होणारच
करभवन प्रकल्प उद्घाटनाच्या पूर्वसंध्येलाच दक्षिण गोव्यातील एका बडय़ा उद्योजकास कोटय़वधींच्या करचोरीप्रकरणी झालेल्या अटकेची संधी घेत मुख्यमंत्र्यांनी सदर इशारा दिला. या अटकेचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्ष उल्लेखही केला, त्याचबरोबर अशाप्रकारची कारवाई सुरू केल्याबद्दल खात्याच्या टीमचे अभिनंदनही केले. गुरुवारी झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर आता ही कारवाई यापुढेही चालूच राहणार आहे. ज्यांनी कर चुकविला त्यांना अटक ही होणारच आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जीएसटी व अबकारी कार्यालयाचेह स्थलांतरण
सरकारी कर्मचाऱयांना प्रशस्त आणि प्रसन्न वातावरणात काम करणे शक्य व्हावे या उद्देशाने सरकारने राज्यातील विविध खात्यांसाठी आतापर्यंत अनेक इमारतींची उभारणी केली आहे. त्यात आता कर भवनची भर पडली आहे. याच इमारतीत लवकरच जीएसटी आणि अबकारी कर कार्यालयेही स्थलांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
जुन्या इमारतींची होणार फेरबांधणी
आल्तिनोवर यापूर्वी आयटी व वन भवन या इमारती उभारण्यात आल्या आहेत. आता त्यात कर भवन प्रकल्पाची भर पडली आहे. या पॅम्पसमध्ये अजूनही काही जुन्या इमारती असून त्यांचीही लवकरच फेरबांधणी करण्यात येणार आहे. तसे आदेश आपण साधनसुविधा महामंडळातील अधिकाऱयांना दिले आहेत. त्यानंतर या संपूर्ण परिसराला नवी झळळी प्राप्त होणार आहे, या प्राकारात सुमारे 40 चारचाकी आणि 100 दुचाकी पार्क करण्याची सुविधा असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बारा लाखांपासून चार हजार कोटीपर्यंतचा प्रवास
1964 पासून 12 लाख रुपये कररुपाने प्राप्त होत होते, ते आता 2021 मध्ये 4 हजार कोटी पेक्षा जास्त महसूल मिळत आहे. जीएसटी हे महसूल प्राप्ती देणारे कार्यालय आहे. त्यामुळे तेथील कर्मचारीही तेवढेच तज्ञ व कार्यतत्पर असणे आवश्यक असून तेव्हाच आम्ही अधिकाधिक महसूल गोळा करू शकणार आहोत. वर्ष 2020 पासून आमचे इकॉनॉमिक इंटलिजन्स युनिट आणि एन्फोर्समेंट युनिट कार्यतत्पर झालेले आहेत. त्यामुळे करचुकवेगिरी करणाऱया अनेकांना आता भीती वाटू लागली आहे, अशी खोचक टीकाही मुख्यमंत्री सावंत यांनी केली.