2 वर्षीय मुलाला विकून प्रेयसीसोबत भटकंती
चीनमध्ये एका निर्दयी पित्याने स्वतःच्या दोन वर्षीय मुलाला विकून मिळालेल्या पैशातून देशाटन केले आहे. या व्यक्तीचा स्वतःच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. तर मुलाचा ताबा त्याला मिळाला होता. मुलाची देखभाल करणे न जमल्याने त्याने धक्कादायक निर्णय घेतला आहे.
शी असे आडनाव असलेल्या व्यक्तीने हे क्रूर कृत्य केले आहे. त्याचे पत्नीसोबत नेहमी भांडण व्हायचे आणि यातूनच दोघांनी घटस्फोट घेतला होता. या जोडप्याला दोन मुले होती. महिलेने मुलीचा ताबा घेतला होता. तर शी याला मुलाचा ताबा मिळाला होता.
अन्य शहरात काम करत असल्याने त्याने स्वतःच्या मुलाला स्वतःच्या भावाकडे हुजोऊ शहरात सोडले होते. परंतु मागील महिन्यात तो शहरात आला आणि त्याने स्वतःच्या मुलाला सोबत नेले होते. मुलाची आई त्याला पाहू इच्छिते, याचमुळे त्याला नेत असल्याचे त्याने सांगितले होते.
शी याने स्वतःच्या मुलाला चांग्सू शहरातील एका जोडप्याला विकले होते. या व्यक्तीने स्वतःच्या मुलाच्या बदल्यात 24.5 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 17 लाख रुपयांची रक्कम वसूल केली होती. त्यानंतर शी स्वतःच्या प्रेयसीसोबत देशाच्या भ्रमंतीसाठी बाहेर पडल्याचा आरोप आहे.
अनेक दिवसांपर्यंत मुलाला परत न आणल्याने शीच्या भावाने याची कल्पना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शी याला अटक केली आहे. यापूर्वीही शी याने पत्नीसोबत मिळून स्वतःच्या दोन मुलींची विक्री केल्याचा आरोप आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.