वय वाढू लागल्यावर अनेकांच्या तब्बेतीच्या तक्रारी सुरू होतात. त्यातच महिलांना गुडघेदुखी, सांधेदुखीसारख्या तक्रारी सुरू होतात. त्यामुळे त्यांना दैनंदिन कामं करणंही कठीण होऊन बसतं. मात्र केरळच्या 77 वर्षीय मीनाक्षी अम्मा मुलांना आणि तरुणांना भारतातलं सर्वात जुनं मार्शल आर्टचं तंत्र शिकवत आहेत. त्यांचा उत्साह बघून आपणही थक्क होऊन जातो.
मार्शल आर्ट शिकणं किंवा शिकवणं अजिबात सोपं नसतं. यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. खूप घाम गाळावा लागतो. त्यातच वयाच्या एका टप्पानंतर हालचाली मंद होत असताना मार्शल आर्टचे धडे देणं जवळपास अशक्य होऊन बसतं. मात्र केरळच्या मीनाक्षी अम्मा खूप उत्साही आहेत. वयाच्या 77 व्या वर्षीही त्या धडधाकड आहेत. ‘कलारीपयट्टू’ हे केरळचं मार्शल आर्ट त्या मुलांना शिकवत आहेत. कलारीपयट्टू हे भारतातलं सर्वात जुनं मार्शल असून ते खूप कठीणही आहे. मात्र मीनाक्षी अम्मा हे आर्ट अगदी लिलया करतात. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या वयाचा अंदाजच येत नाही. त्यांना मार्शल आर्टची ही कला पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवायची आहे आणि त्याचसाठी त्या झटत आहेत. मीनाक्षी अम्मा साडी नेसून तासनतास सराव करत असतात. आजच्या महिलांना साडीमध्ये वावरणं त्रासदायक वाटत असताना त्या साडीत मार्शल आर्ट करतात.
मीनाक्षी अम्मा वयाच्या सातव्या वर्षापासून कलारीपयट्टूचे धडे घेत आहेत. बालपणापासूनच त्यांना या मार्शल आर्टची आवड निर्माण झाली आणि त्यांनी या कामात स्वतःला जुंपून घेतलं. मीनाक्षी अम्मांकडे वय वर्ष सहा ते वय वर्षं 26 या वयातल्या मुली या मार्शल आर्टचे धडे घेण्यासाठी येतात. अर्थात मुलंही ही कला शिकायला येतात. मात्र मुलींमध्ये ही कला बरीच लोकप्रिय असल्याचं दिसून येतं. ही कला कमी वयात शिकायला सुरू करायला हवी असं मीनाक्षी अम्मा सांगतात. कलारीपयट्टू जेवढ्या लवकर शिकायला सुरू करू तितक्या सहजपणे यात निष्णात होता येतं असं त्यांचं म्हणणं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मीनाक्षी या कलेचं प्रशिक्षण मोफत देत आहेत. त्या आपल्या विद्यार्थी तसंच विद्यार्थीनींकडून एकही पैसा घेत नाहीत.त्यांना फक्त या कलेचा प्रचार करायचा आहे. मीनाक्षी यांचे अनेक विद्यार्थी त्यांचा वारसा चालवत आहेत. मीनाक्षी यांच्या वडिलांनी कायम त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यामुळे ही कला मीनाक्षी यांच्या आयुष्याचा भाग बनून गेली. इतकंच नाही तर ते त्यांचं आयुष्यच बनलं. मीनाक्षी वयाच्या सतराव्या वर्षापासूनच या कलेचं प्रशिक्षण देत आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.