कारागृहाच्या सुरक्षेसाठी जिल्हा नियोजन समितीकडे 50 लाखांचा प्रस्ताव सादर
68 सिसीटीव्हींसह 12 हायमास्ट दिवे बसवण्याचे नियोजन
आशिष आडिवरेकर / कोल्हापूर
कळंबा कारागृहात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱया घटनांच्या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासन सतर्क झाले असून सुरक्षेबाबत अधिक आक्रमक झाले आहे. कळंबा कारागृह प्रशासनाने जिल्हा नियोजन मंडळाकडे 50 लाखांच्या विविध कामांचा प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये नवीन 68 सिसीटीव्ही कॅमेरे, 12 हायमास्ट लाईट बसविण्यात येणार आहेत. यामुळे कारागृहामध्ये व कारागृहाबाहेरील हालचालींवर करडी नजर ठेवून गैरकृत्यांना पायबंद घालण्यास मदत मिळणार आहे.
कळंबा कारागृहामध्ये मुंबई, पुणे यासह राज्यासह देशभरातील नामचिन गुंड शिक्षा भोगत आहेत. खून, मारामारी, दरोडा यासह बॉब्मस्फोट अशा गंभीर घटनांमधील कैदी आहेत. कारागृहामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये लागोपाठ घडलेल्या तीन घटनांमध्ये 13 मोबाईल, 10 बॅटरी, पेन ड्राईव्ह, गांजा जप्त करण्यात आला. वारंवार घडणाऱया या घटनांमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे.
कारागृहात सध्या 73 सिसीटीव्ही कॅमेरे आहेत. यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. कारागृहातील अंतर्गत सुरक्षेसाठी आणखी 32 बाहेरील घटनांवर करडी नजर ठेवण्यासाठी तटबंदीवर 36 सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या दोन्हीसाठी 33 लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. तर 17 लाख रुपये खर्चून कारागृहामध्ये 5 तर तटबंदीभोवती 7 हायमास्ट बसविण्यात येणार आहेत. गुरुवारी अधिक्षक इंदुरकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेवून हा प्रस्ताव सादर केला आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी मिळून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.
कारागृहाची रचना
24 एकर जागेत विस्तार
8 सर्कल
45 बॅराक
10 अंडासेल
73 कॅमेरे
2400 कैदी
137 अधिकारी कर्मचारी
कारागृहामध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. कारागृहात व बाहेर घडणाऱया घटनांवर नजर ठेवण्यासाठी कारागृहात आणखी 68 कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे.
-चंद्रमणी इंदूरकर, कारागृह अधिक्षक
कारागृहाबाहेर 2 चौक्या
कारागृहाबाहेरुन कारागृहात गांजा, मोबाईल फेकण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहाच्या बाहेर 2 चौक्या तयार करण्यात येणार आहेत. मुख्य रस्त्यालगत तटबंदीजवळ 1 तर पाचगांवकडे जाणाऱया रोडवर 1 नवीन चौकी उभारण्यात येत आहे.