वार्ताहर / कळे
कोल्हापुर-गगनबावडा मार्गावरील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या कळे (ता.पन्हाळा) येथे महापुरामुळे कळे कॅन्टीनसह मुख्य रस्ता व धरण, पेट्रोलपंप परिसर बाजारपेठेतील सुमारे चारशे छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये पुराचे पाणी जावून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पडझड झाली असून शेतीपिकांनाही मोठा फटका बसला आहे.
कुंभी नदी पात्रालगत कळे धरणापासून कळे कॅन्टीन, पेट्रोल पंप ते आंबेडकरनगर कमान, मुख्य रस्ता ते कुंभारवाडा चौक, पुनाळफाटा अशी सुमारे दोन ते तीन किमी अंतरामध्ये विस्तारलेली आहे. गुरुवारी (ता.२२) सकाळी पुराचे पाणी रस्त्यावर आले आणि सायंकाळी मार्ग बंद झाले. एका रात्रीत महापुराने रौद्र रुप धारण करून १९८९, २००५ व २०१९ सालापेक्षा जास्त पाणी गावात शिरले. अचानक आलेल्या संकटामुळे काही ठिकाणचा अपवाद वगळता सर्वच दुकानांमध्ये साहित्य हलविण्यास वेळ मिळाला नाही. महापुराचे पाणी जाऊन विविध दुकाने, हॉटेल, बेकरी,इलेक्ट्रॉनिक शोरुम, मेडिकल, गॅरेज यांचे मोठे नुकसान झाले. कळे पोलीस ठाणे, पेट्रोल पंप, दूध संकलन केंद्र, गॅस एजन्सी, सॉ मिल,वाळू डेपो, महाविद्यालय आदी ठिकाणी पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला.
कळे कॅन्टीन व धरण परिसरातील अनेक दुकानांची पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे मोठी पडझड झाली असून अनेक लहान दुकाने व टपऱ्या वाहून गेल्या आहेत. कळे धरण परिसरातील देसाई हॉटेल पाण्याच्या प्रवाहामुळे जमीनदोस्त झाले. कळे परिसर व धामणी खोऱ्यातील शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांब वाकले असून अनेक विद्युत ट्रान्सफॉर्मर खराब झाले आहेत. महसूल विभागाच्या वतीने पडझड झालेली घरे व नुकसान झालेल्या दुकानांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान महापुरामध्ये घरपण (ता.पन्हाळा) येथील भगवान बापू येरूडकर व अनिल बापू येरुडकर यांच्या गोठ्यातील तीन म्हैशी व एक गाय अशी चार जनावरे बुडून मृत्युमुखी पडल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. आत्तापर्यंतच्या आलेल्या सर्वात मोठ्या महापुरामुळे धामणी खोऱ्यातील अनेक गावातील डोंगरांमध्ये भूस्खलन होऊन धोका निर्माण झाला आहे.