प्रतिनिधी/ पणजी
काँग्रेस पक्षाचे गोव्याचे नवे प्रभारी दिनेश गुंडुराव यांचे नव्या पदाचा ताबा घेतल्यानंतर प्रथमच गोव्यात आगमन झाले असून त्यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, तसेच इतर वरिष्ठ नेते, पदाधिकारी यांच्याशी काँग्रेस भवनात चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी ते गोव्यात आले असून शनिवारी काँग्रेस आमदारांना भेटणार आहेत. गोव्यातील एकूण राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन नंतरच भाष्य करणार असल्याचे त्यांनी काही पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले की, गोव्यासारख्या सुंदर प्रदेशाचे प्रभारीपद आपणास देण्यात आले हा मोठा सन्मान असून आपण गोव्याशेजारील कर्नाटक राज्याचा असल्यामुळे गोव्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणार आहे. गोव्यातून शांताराम नाईक व इतर काहीजण कर्नाटकाचे प्रभारी म्हणून आले होते तसेच कर्नाटकातूनही काही जण गोव्याचे प्रभारी या नात्याने गेले होते, याची आठवण गुंडुराव यांनी करून दिली.
जनतेच्या समोर जावून त्यांचे म्हणणे ऐका
सध्या काँग्रेसतर्फे गोव्यात विविध ठिकाणी जनतेच्या प्रश्नांवर तसेच काही ज्वलंत विषयांवर धरणे आंदोलने सुरू आहेत. त्याची त्यांनी दखल घेऊन अशी आंदोलने चालू ठेवा, जनतेच्या समोर चला आणि त्यांचे म्हणणे ऐका, असा संदेश राव यांनी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे पदाधिकारी युवक काँग्रेस महिला, काँग्रेस पदाधिकारी, सेवा दल अशा सर्वांची त्यांनी भेट घेतली आणि चर्चा केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पक्ष कुठे कमी पडतो, काय करायला हवे, याबाबत त्यांनी सर्वांशी विचारविनिमय केला.
आज संभाव्य उमेदवारांशी चर्चा करणार
शनिवारी ते विविध गट काँग्रेस अध्यक्ष, काँग्रेसचे आमदार, माजी आमदार, प्रमुख कार्यकर्ते, संभाव्य उमेदवार यांच्याशी बोलणी करणार असून गोव्यात काँग्रेस पक्ष पुन्हा कसा काय बळकट करता येईल यावर ते सर्व संबंधितांशी चर्चा करणार असल्याचे काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितले. त्यांची गोवा भेट दोन दिवसांची असून अधून मधून संघटनात्मक कामासाठी गोव्यात येणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.