शामनूर शिवशंकरप्पा, एम. बी. पाटील यांच्याकडून नेतृत्त्व बदलाला विरोध
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात नेतृत्त्व बदलाची चर्चा सुरू झालेली असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्या कथित ऑडीओs क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नलीनकुमार कटील यांनी ऑडीओs क्लिपशी आपला संबंध नसल्याचे सांगितले आहे. याच दरम्यान, लिंगायत समुदायातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना पाठिंबा दर्शविला आहे. तर उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण, आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी पुढील दोन वर्षे येडियुराप्पाच मुख्यमंत्रिपदी असतील असे सांगितले आहे.
सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अखिल भारत वीरशैव महासभेचे अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा यांनी येडियुराप्पा यांची भेट घेऊन चर्चा केली. वीरशैव महासभा येडियुराप्पा यांच्या पाठिशी आहे. त्यांना पदावरून हटविल्यास जे. एच. पटेल, निजलिंगप्पा, विरेंद्र पाटील, एस. आर. बोम्माई यांना पदच्युत केल्यानंतर जी परिस्थिती उद्भवली, त्याची पुनरावृत्ती होईल, असा इशारा शामनूर शिवशंकरप्पा यांनी भाजप हायकमांडला दिला आहे.
माजी मंत्री आणि काँग्रेस नेते एम. बी. पाटील यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाचे समर्थन केले आहे. येडियुराप्पा यांना पायउतार केले तर भाजप हायकमांडला लिंगायत समाजाचा रोष ओढवून घ्यावा लागेल. येडियुराप्पा यांचे वय आणि विकासकार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, असे ट्विट त्यांनी केले आहे.
ध्वनीफितीशी संबंध नाही : कटील
ऑडीओs क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी, आपला त्या ध्वनीफितीही काहीही संबंध नाही. ध्वनीफितीमधील आवाज आपला नाही. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
भाजप आमदारांनी केली चौकशीची मागणी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्या नावाने व्हायरल झालेली ऑडीओs क्लिप बनावट आहे. याबाबत चौकशी करावी, अशी मागणी करून पक्षातील पाच आमदारांनी मंगळूर शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. आमदार वेदव्यास कामत, राजेश नायक, उमानाथ कोटय़ान, संजीव मठंदूर, हरिष पुंजा यांनी मंगळूर पोलीस आयुक्ताकडे तक्रार केली असून ऑडीओ क्लिप प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.