पक्षाला बसणार मोठा झटका
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशच्या शाजापूर जिल्हय़ातील काँग्रेसच्या तरुण आमदाराला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आमदाराला भोपाळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे काँग्रेसचे अनेक आमदार भयभीत झाले आहे. कोरोनाग्रस्त आमदाराच्या संपर्कात अन्य आमदार आले होते. 19 जून रोजी मध्यप्रदेशात राज्यसभा निवडणुकीसाठी होणाऱया मतदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
बाधित आमदार हा दिग्विजय सिंग आणि जीतू पटवारी यांचा समर्थक मानला जातो. आमदाराचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पक्षाच्या अन्य आमदारांनाही संसर्गाचा धोका आहे. काँग्रेसचे अनेक आमदार मागील काही दिवसांमध्ये त्याच्या संपर्कात राहिले आहेत. आमदाराला कोरोनाची बाधा झाल्याने त्यांचे समर्थकही घाबरले आहेत.
भोपाळ हादरले
भोपाळमध्ये माजी विरोधी पक्षनेते अजय सिंग यांच्या गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हा आमदार उपस्थित होता. पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते तसेच कार्यकर्ते मोठय़ा संख्येत उपस्थित होते. आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राजधानी भोपाळमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक नेत्यांनी आयसोलेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदानावर प्रभाव?
आमदाराला कोरोना बाधा झाल्याने काँग्रेस पक्षाच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. राज्यात राज्यसभेच्या 3 जागांसाठी 19 रोजी मतदान होणार आहे. काँग्रेस आणि भाजपच्या प्रत्येकी 1 उमेदवाराचा विजय निश्चित आहे. परंतु दोन्ही पक्ष दुसऱया जागेसाठी शक्ती पणाला लावत असून याकरता प्रत्येक आमदाराचे मत महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत कोरोना संसर्ग काँग्रेसकरता मोठा अडथळा ठरू शकतो.