बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांना मंगळवारी बेंगळूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना जास्त ताप असल्याने तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान रुग्णालयात दाखल केल्यानंतर सिद्धरामय्या यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ओल्ड एअरपोर्ट रोडच्या मणिपाल रुग्णालयात सिद्धरामय्या यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या सिद्धरामय्या यांची प्रकृती स्थिर आहे आणि वैद्यकीय तज्ञांच्या पथकाद्वारे त्यांच्यावर योग्यप्रकारे उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, सिद्धरामय्या यांना याआधी कोरोनाची लागण झाली होती. ते कोरोनावर यशस्वी मात करत रुग्णालयातून घरी परतले होते.