प्रतिनिधी/ बेळगाव
बंद घरे फोडून रोख रक्कम व ऐवज लंपास करणाऱया चोरटय़ाला काकती पोलिसांनी संशयास्पदरीत्या फिरताना अटक केली. त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम जप्त केली आहे. यल्लाप्पा भीमाप्पा नाईक (वय 47, रा. हगीदाळ) असे त्या चोरटय़ाचे नाव आहे. काकती पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त के. त्यागराजन यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
आरोपी यल्लाप्पा नाईक याने फिर्यादी यल्लाप्पा गंगाराम गौडण्णावर यांचे घर फोडून कपाटात ठेवलेली 14 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 17.5 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 5 ग्रॅमची बोरमाळ आणि रोख 1 लाख 35 हजार रुपये असा एकूण 2 लाख 71 हजार रुपयांचा ऐवज लांबविला होता. या घटनेनंतर यल्लाप्पा गौडण्णावर यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती.
काकती पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. यल्लाप्पा नाईक हा संशयास्पदरीत्या पणगुत्ती बस स्थानकाजवळ फिरत होता. यावेळी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस आयुक्त के. त्यागराजन, उपायुक्त विक्रम आमटे आणि वाहतूक व गुन्हे विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर निलगार, एसीपी के. शिवारेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.