औषधांसह साधन-सामुग्री, निधीही कमी पडू देणार नाही
प्रतिनिधी / कागल
दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यासाठी 500 अद्ययावत बेडची सुविधा निर्माण केली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. हे महाभयानक संकट गावागावांपर्यंत शिरले आहे. यामुळेच लोक आता तरी गांभीर्याने घेणार आहेत की नाहीत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गुरुवारी एकाच दिवशी कागल तालुक्यातील 78 रुग्ण बाधित झाल्यामुळे मला धक्काच बसला, असे ते म्हणाले.कागल मध्ये डी. आर. माने महाविद्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. मुश्रीफ बोलत होते.
कागल कोविड केंद्रामध्ये 50, केंद्राच्या परिसरातील गोडाऊन क्रमांक एक मध्ये 100, गोडाऊन क्रमांक दोन मध्ये 100, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीग्रह येथे 100 व अर्जुननगरच्या देवचंद महाविद्यालयात 150 अशी 500 बेडची ही सुविधा निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात एकूण ७४८ पॉझिटीव्ह पेशंट आहेत. यामध्ये ३३१ उपचार घेत असून ३९१ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर दुर्देवाने २६ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुश्रीफ पुढे म्हणाले, शासकीय हॉस्पिटलमध्ये सामान्य गोरगरीब माणूस उपचारासाठी येतो. श्रीमंत व्यक्ती खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेते. जनतेला खाजगी उपचार परवडत नाहीत. रुग्णालयांमध्ये गोरगरिबांसाठी बेड वाढवणे अत्यावश्यक आहे. सध्या पूर्व भागामध्ये आयजीएम हॉस्पिटल इचलकरंजी, घोडावत कोविड रुग्णालय, सीपीआर रुग्णालय कोल्हापूर आणि गडहिंग्लज येथील कोविड रुग्णालयांमध्येच गरिबांच्यावर उपचार करण्यात येतात. त्याठिकाणी बेडची संख्या वाढवणे आवश्यक आहे.
या बैठकीला प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, कागल नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी श्री. गोरे, कृषी अधिकारी श्री. माळी, बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. डी. बी. शिंदे आदी उपस्थित होते.