प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण मतदारसंघातील भाजपाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा दावा करत माजी मंत्री रमेश तवडकर यांनी काणकोणातील विविध पंचायत क्षेत्रांत घर चलो अभियान सुरू केले आहे. आपल्या असंख्य समर्थकांसहित लोकसंपर्कासाठी गावागावात फिरणाऱया तवडकर यांना बऱयापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
गावडोंगरी पंचायतीमधील कर्वे, इंद्रावाडा, कुडेवाडा, झिलतावाडी, सातोर्ली, फुलामळ, खोतीगाव पंचायत क्षेत्रातील बड्डे, नडके, पैंगीण पंचायतीमधील आमोणे, मार्ली, श्रीस्थळ पंचायतीमधील भाटपाल, नवावाडा या ठिकाणी राबविलेल्या घर चलो अभियानाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत केलेल्या विकासकामांचा लेखाजोगा ते आपल्या कार्यकर्त्यांसहित मतदारांसमोर मांडत आहेत. त्यापूर्वी आमोणे येथील संस्कृती भवनात एकूण 35 बुथांवरील कार्यकर्त्यांचा त्यांनी मेळावा घेतला. या मतदारसंघातील महिला कार्यकर्त्यां आणि युवा कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन त्यांनी रूपरेषा ठरविली आहे.
भाजप उमेदवारीचे दुसरे दावेदार उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी नुकताच शेळी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन एक प्रकारे शक्तिप्रदर्शन केले आहे. या मेळाव्याच्या व्यासपीठावर काणकोण मतदारसंघातील भाजप मंडळ, महिला मोर्चा आणि युवा मोर्चाचे प्रमुख कार्यकर्ते तसेच भाजपाचे दक्षिण गोवा सरचिटणीस सर्वानंद भगत उपस्थित होते. पक्ष ज्या व्यक्तीला उमेदवारी देईल त्याच्यासाठी काम करण्याचा निर्णय जरी बहुतेकांनी या बैठकीत व्यक्त केलेला असला, तरी प्रत्येकाच्या मनात नेमके काय शिजत आहे त्याविषयी पुसटशी शंका यावेळी काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. खुद्द फर्नांडिस यांनी देखील उमेदवारी नाही मिळाली तर काय करायचे त्याचा निर्णय नंतर घेण्यात येईल असे सांगून एक प्रकारे पक्षाला आव्हान दिले आहे.
भाजपाच्या चिन्हावर दोन वेळा काणकोणचे आमदार झालेले आणि 2017 च्या निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळूनही तवडकर यांनी केलेल्या बंडामुळे पराभूत झालेले विजय पै खोत यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असून सध्या त्यांनी या मतदारसंघात वैद्यकीय शिबिरे घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. यापूर्वी त्यांनी पैंगीण, शेळेर, तळपण, गावडोंगरी भागांत वेगवेगळी वैद्यकीय शिबिरे घेतली आहेत. या शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली. त्यापूर्वी या मतदारसंघातील घराघरांना त्यांनी भेटी देऊन जागृती केली आहे. हे तिन्ही उमेदवार भाजपाचे असल्यामुळे या मतदारसंघात भाजपाच्या मतांची मोठय़ा प्रमाणात विभागणी होणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे.
या तिघांशिवाय काँग्रेस व गोवा फॉरवर्ड युतीचा उमेदवार, मगो व तृणमूल काँग्रेस युतीचा उमेदवार, आम आदमी पक्ष तसेच आरजीचा उमेदवार अशी लढत या मतदारसंघात होणार आहे. काँगेसतर्फे चेतन देसाई, महादेव देसाई, गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक, आम आदमी पक्षाचे ऍड. अनुप कुडतरकर आणि आरजीचे प्रशांत पागी हे देखील कामाला लागले असून सर्वांनी घरोघरी भेटीवर भर दिला आहे.