प्रतिनिधी/ काणकोण
सुरुवातीला जनता कर्फ्यू आणि त्यानंतर लॉकडाऊन जाहीर केल्याने काणकोण तालुक्यात विविध राज्यांतून आलेले कामगार बेकार पडलेले आहेत. काम केल्यानंतरच रोजंदारी आणि त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी हे परप्रांतीय कामगार करत आलेले आहेत. काणकोण तालुक्यात श्रीस्थळ पंचायत क्षेत्रात आणि पालिका क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात या कामगारांचे वास्तव्य असून या कामगारांना तांदूळ, डाळ आणि आटा पुरविण्याचे काम सरकारमार्फत करण्यात येत आहे. सुरुवातीला हा आकडा साधारणपणे 500 इतका होता. पण सध्या तो 800 च्या घरात पोहोचला असल्याची माहिती मामलेदार विमोद दलाल यांनी दिली. काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या सर्व कामगारांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात येत आहेत.
लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या कामगारांना अन्नपुरवठा करण्यासाठी लोलयेच्या श्री निराकार देवस्थानने 100 किलो, तर श्री केशव देवालयाने 50 किलो व श्री दामोदर देवालयाने 50 किलो इतका तांदळाचा साठा काणकोणच्या मामलेदार कार्यालयाकडे सुपूर्द केला आहे. या देवस्थान समित्यांच्या या मानवतावादी कार्याचे कौतुक करतानाच काणकोण तालुक्यात ज्या अन्य धार्मिक संस्था आहेत त्यांनी याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
लॉकडाऊन केल्यानंतर तब्बल 5 दिवसांनी चावडीवरील बागायतदार भवन 4 रोजी खुले करण्यात आले. मात्र नेहमीप्रमाणे प्रवेश करून मालाची निवड करण्याच्या प्रक्रियेवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. ग्राहकांना आवश्यक असलेल्या मालाची यादी प्रवेशद्वाराजवळच्या कक्षात सादर करून त्याच ठिकाणी बिल फाडल्यावर व पैशांचा भरणा केल्यानंतर बागायतदार भवनामधील महिला कर्मचारी माल आणून दारापर्यंत देतात. त्यामुळे शिस्तबद्धरीत्या या ठिकाणी व्यवहार चालू असून ग्राहक देखील एका रांगेत राहून माल स्वीकारत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पालिका कार्यालय इमारत, जुन्या बसस्थानकासमोर उघडय़ावर फळ-भाज्यांची विक्री चालू असून ती खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
पोलिसांनी पास न दिल्याचा दावा
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण घरपोच होणे खूपच महत्त्वाचे आहे. लोकांना जर आपल्या घरीच जीवनावश्यक वस्तू मिळाल्या तर, लोक घरातून बाहेर कशाला पडतील आणि रस्त्यावर गर्दी तरी कशी होईल असा विचार करून एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आपण काणकोण मतदारसंघातील बऱयाच भागांमध्ये कडधान्ये, भाजीपाला पुरविण्याचे काम केले. मात्र त्यासाठी आपल्याला पास द्यायला देखील काणकोण पोलीस स्थानकावरून नकार देण्यात आला, अशी खंत प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव असलेले माजी नगराध्यक्ष महादेव देसाई यांनी व्यक्त केली आहे.
इजिदोर यांचा वाढदिन साध्या पद्धतीने साजरा
4 रोजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि भारतीय परंपरेप्रमाणे ओवाळणी करून आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा केला. यावेळी लोलयेचे माजी सरपंच अजय लोलयेकर, पंच सचिन नाईक आणि पैंगीणचे दीपक नाईक उपस्थित होते. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 5 रोजी रात्री 9 वा. दीप प्रज्वलित करण्याचे जे आवाहन केले आहे त्याचे पालन काणकोण मतदारसंघातील तमाम नागरिकांनी करावे, असे आवाहन फर्नांडिस यांनी केले आहे.