तक्रारीची दखल घेतली नसल्याचा दावा, निरीक्षकांच्या शिष्टाईनंतर उपोषण मागे
प्रतिनिधी / काणकोण
सादोळशे-काणकोण येथील कार्मिना पेरेरा या विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसहित आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी करून काणकोणच्या पोलीस स्थानकावर धरलेले उपोषण अखेर काणकोणचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या शिष्टाईनंतर मागे घेतले. यापुढे आपल्या हक्कांसाठी आपण न्यायालयात जाणार असल्याचे पेरेरा यांनी स्पष्ट केले आहे. आपले पती जेरॉम पेरेरा हे मागच्या डिसेंबर, 2020 पासून बेपत्ता असल्यासंबंधीची तक्रार आपण काणकोणच्या पोलीस स्थानकावर दिली होती. त्यानंतर आपले पती तसेच एका अनोळखी महिलेकडून आपल्याला फोनवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. यासंबंधीची तक्रार 3 एप्रिल रोजी आपण काणकोणच्या पोलीस स्थानकावर केली होती. मात्र या तक्रारीची साधी नोंद देखील काणकोणच्या पोलीस स्थानकावर घेण्यात येत नसल्याने त्याच्या निषेधार्थ आणि आपल्याला न्याय द्यावा यासाठी आपल्या दोन मुलींसहित हा मार्ग पत्करावा लागला, असा दावा पेरेरा यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मात्र ज्या दिवशी सदर महिला काणकोण पोलीस स्थानकावर आली होती त्यावेळी आपण गावडोंगरी, खोतीगाव भागात टेहळणीसाठी गेलो होतो. त्या ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे संपर्क होऊ शकला नसल्याचे निरीक्षक नाईक यांनी सांगितले.