आत्मघाती हल्लेखोराचा खात्मा- मुलासह दोघांचा मृत्यू
काबूल / वृत्तसंस्था
अमेरिकेने रविवारी संध्याकाळी काबूल विमानतळाजवळ हवाई हल्ला केला. ‘आयएसआयएस-के’चा आत्मघाती बॉम्बर काबूल विमानतळावर हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच ड्रोनच्या मदतीने कार उडवण्यात आली. यामध्ये एका मुलासह 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेने एक निवेदन जारी करत हल्ल्याची माहिती दिली.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाला काबूलमध्ये पुन्हा घातपात होणार असल्याची कुणकूण लागली होती. त्यानंतर पूर्णपणे सतर्कता बाळगली जात होती. तसेच संशयितांवर नजर ठेवण्यात येत होती. त्यानुसार संशयितांच्या कारवर हल्ला केल्यानंतर त्यात आणखी एक स्फोट झाला. हा हल्ला रविवारी संध्याकाळी विमानतळाच्या पश्चिमेला खाज-ए-बुघरा या निवासी भागात झाला. यापूर्वी गुरुवारी काबूल विमानतळाजवळ दोन आत्मघाती हल्ले झाले होते. यात 170 लोकांचा बळी गेला. तालिबाननेही या घटनेची पुष्टी करणारे निवेदन जारी केले आहे. मात्र, आत्मघाती हल्लेखोर वाहनात नव्हता, असेही सांगितले जात आहे.
जो बायडन यांचा सतर्कतेचा इशारा
अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर आणखी एका आत्मघाती हल्ल्याची शक्मयता असल्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्वतः दिला होता. हा हल्ला पुढील 24-36 तासात होण्याची शक्मयता आहे, असेही ते म्हणाले होते. काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढलाय. पुढील काही काळात हे हल्ले होण्याची शक्मयता असल्याची माहिती सैन्याच्या कमांडरांनी दिलीय, असेही बायडन यांनी नमूद केले आहे. बायडन यांनी यासंबंधी वॉशिंग्टनमध्ये राष्ट्रीय सुरक्षा टीम आणि काबूलमधील सैन्य अधिकाऱयांशी चर्चा केली आहे.