बांधकाम व्यवसायातील निर्मिती संस्थांकडून घेणार एक टक्का कर, कामगार आयुक्त व्यंकटेश सिंद्धीहट्टी यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी कर जमविण्याची प्रक्रिया सुरू असून कामगार कल्याण कायदा-1996 च्या नियम 1998 अन्वये बांधकाम व्यवसायातील निर्मिती संस्थांकडून एक टक्का कर जमविण्यात येत आहे. यासाठी अधिकाऱयांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कामगार आयुक्त व्यंकटेश सिंद्धीहट्टी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बांधकाम व्यवसायातील कामगार व इतर निर्मिती संस्थेतील कामगारांच्या कल्याणासाठी करसंग्रह करण्यासंबंधी अधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीत बोलताना कामगार आयुक्त म्हणाले, करसंग्रहाची जबाबदारी कामगार खात्याच्या अधिकाऱयांवर सोपविण्यात आली आहे.
कायदेशीरपणे व नियमानुसार नावे नोंदविलेल्या लाभार्थींना विविध सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाची आवश्यकता आहे. म्हणून या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. बांधकाम व्यवसायातील संस्थांना अधिकाऱयांनी भेटी देऊन कामगार कायद्यानुसार संस्थेची नोंदणी झाली आहे का? याची खात्री करून घ्यावी, अशी सूचनाही आयुक्तांनी केली.
सर्व इमारतींची यादी करणार
ड्रेनेज, फुटपाथ, उद्याने, क्लब हाऊस, गेस्ट हाऊस, स्विमिंग पूल, रस्ते, खेळाची मैदाने निर्मितीसाठी केल्या जाणाऱया खर्चाचीही पाहणी करण्यात येणार आहे. कर आकारणीसाठी या कामांचीही नोंद घेतली जाणार आहे. सध्या बांधकामाच्या टप्प्यात असलेली व कामे पूर्ण झालेल्या सर्व खासगी, सरकारी इमारतींची यादी तयार करण्यात येणार आहे. 10 लाख रुपयांहून अधिक खर्च करून घर बांधलेल्या घरमालकांकडूनही कर आकारण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार आयुक्तांनी दिली.
कर आकारणीसाठी असलेल्या अर्जांसंबंधी माहिती देण्यात येणार आहे. याबरोबरच चेक किंवा डीडीच्या माध्यमातून कर जमा कसा करावा? याविषयी जागृती करण्यात येणार आहे. जर बांधकाम व्यवसायातील संस्थांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार त्यांना नोटिसा पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही कामगार आयुक्तांनी दिला आहे.
यावेळी कामगार विभागाच्या तरन्नुम बेंगाली, साहाय्यक कामगार आयुक्त अन्सारी यांच्यासह वेगवेगळय़ा विभागाचे अधिकारी, बांधकाम व्यवसायासंबंधातील संस्थांचे मालक उपस्थित होते.