वार्ताहर/ राजापूर
मतदान यादी दुरूस्तीच्या कामात टाळाटाळ करणाऱया 7 केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱयांवर (बीएलओ) कारवाई होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारीपर्यंत मतदान यादी दुरूस्तीचे काम पूर्ण न केल्यास त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या नोटीस संबंधित बीएलओंना बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे बीएलओ म्हणून काम करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.
सद्यस्थितीत निवडणूक विभागामार्फत मतदान यादी दुरूस्तीचे काम सुरू आहे. याकरीता केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) नेमण्यात आले आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. काही शिक्षक संघटनांनी बीएलओचे काम शाळाबाहय़ असून ते करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक शिक्षक बीएलओ मतदान यादी दुरूस्तीचे काम करण्यास टाळटाळ करत होते. काहींनी तर कामाला सुरूवातही केली नव्हती. त्यामुळे राजापुरातील मतदान यादी दुरूस्तीच्या कामात प्रगतीच होत नव्हती.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेताना जे बीएलओ मतदान यादी दुरूस्तीच्या कामात टाळाटाळ करत आहेत, अशांना नोटीस बजावल्या आहेत. 31 जानेवारीपर्यंत मतदान यादी दुरूस्तीचे काम पूर्ण न झाल्यास त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. राजापुरात 7 जणांना अशा आशयाच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे बीएलओ म्हणून काम करणाऱया कर्मचाऱयांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर खडबडून जागे झालेल्या बीएलओंनी मतदान यादी दुरूस्तीचे काम वेगाने सुरु केले असून जवळपास 63 टक्के काम पूर्ण झाले आहे.