‘भाजप वा आपची तिकीट मिळाल्यास रिंगणात उतरणार’
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी आपण मडगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले असून भाजप अथवा आपची उमेदवारी मिळाल्यास आपण ती स्वीकारणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शुक्रवारी मडगाव पालिकेची बैठक संपल्यानंतर पत्रकारांनी शिरोडकर यांना ते मडगाव मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी चर्चा सुरू असल्याने याबद्दल त्यांचे मत विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप आणि आम आदमी पक्षाचे तिकीट मिळाल्यास निवडणूक लढू असे स्पष्ट केले असले, तरी आपण या पक्षांशी बोललेलो नसून या पक्षांनी आपल्याशी संपर्क साधला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आपण स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक लढविण्याचा निर्णय का घेतला असे विचारले असता शिरोडकर म्हणाले की, आपण विविध प्रभागांतून निवडणुक लढवून तिसऱयांदा नगरसेवक बनलो आहे. दोन वेळा नगराध्यक्ष बनलो आहे. त्यामुळे आता आमदार बनून लोकांची सेवा करण्यात आपल्याला आनंद वाटेल. आपण यापूर्वी विधानसभा निवडणूक लढविली नसली, तरी माजी आमदार स्व. बाबू नायक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली असता त्यांचे निवडणूक एजंट म्हणून आपण काम केले होते व त्यावेळी काँग्रेस उमेदवार दिगंबर कामत यांना पराभूत केले होते, असे त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
दिगंबर कामत यांच्या पॅनलमधून शिरोडकर यंदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांच्याशी दोन हात करण्यास ते सज्ज झाले आहेत. कामत यांनी यावेळी आपल्याला नगराध्यक्ष करण्यात अडथळा आणला. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई हे आपल्याला नगराध्यक्ष बनविण्यास तयार होते, पण कामत यांनी खो घातला, असा दावा शिरोडकर यांनी केला. युती न झाल्यास आणि एक वेळ गोवा फॉरवर्डने उमेदवारी दिल्यास आपण स्वीकारणार काय असे विचारले असता नंतर पाहू, सर्व पर्याय खुले असल्याचे ते म्हणाले.