तबलिगी जमातींच्या गैरवर्तनावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतप्त
उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद येथील रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या लोकांनी केलेल्या गैरवर्तनाप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाईचा आदेश देत योगींनी कायद्याचे पालन करणे शिकवू असे उद्गार काढले आहे.
गाजियाबादमध्ये गैरकृत्य करणाऱयांना कायद्याचे पालन करणे शिकवा, असा निर्देश योगींनी प्रशासनाला दिला आहे. गाजियाबादच्या रुग्णालयात दाखल जमातच्या सदस्यांनी परिचारिकांसमोर अश्लील कृत्ये केली. परिचारिकांसमोरच जमातींनी स्वतःचे कपडे उतरविण्याचे प्रकार चालविले आहेत. अश्लील कृत्यासह विडी-सिगारेटची मागणी करण्यात येत आहे.
कोरोनावर मात करू
उत्तरप्रदेशने इंसेफसलायटिस विरोधातील लढा जिंकला असून आता कोरोनावरही मात करू. याचबरोबर भविष्यातील आव्हानांकरता आम्ही तयार होणार आहोत. कुठल्याही संकटात राज्यातील लोकांना पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आहे. प्रयोगशाळा आणि वैद्यकीय सुविधा बळकट करणार असल्याचे योगी म्हणाले.
पुरुष कर्मचारी तैनात
गाजियाबादमध्ये परिचारिकांशी झालेल्या गैरकृत्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तबलिगी जमातच्या लोकांच्या वैद्यकीय मदतीकरता आता महिलांऐवजी पुरुषांना नियुक्त केले जाणार आहे.
इंदोरसारखा प्रकार घडल्यास….
मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये वैद्यकीय पथकावर दगडफेक करण्यात आली होती. असा प्रकार राज्यात घडल्यास कठोर कारवाई करू, असे योगी म्हणाले. उत्तरप्रदेशात कोरोनाचे 113 रुग्ण सापडले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तबलिगी जमातचे कोरोना संशयित आरोग्य कर्मचाऱयांना सहकार्य करण्याऐवजी गैरवर्तन करत आहेत. दिल्लीत डॉक्टरांवर थुंकण्यासह विलगीकरण कक्षात गोंधळ घालण्याचे प्रकार घडले आहेत. तर बिहारमध्ये तबलिगी जमातच्या लोकांचा शोध घेणाऱया पथकावर हल्ला करण्यात आला आहे.