वार्ताहर/ निपाणी
राष्ट्रीय महामार्गावरून निपाणीहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱया कारने धडक दिल्याने युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. सर्वेशकुमार शर्मन रॉय (वय 26 रा. बिहार) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सर्वेश रॉय हा युवक मुळचा बिहारचा आहे. तो सध्या मुधोळ येथे काम करत होता. रविवारी तो निपाणीत असणाऱया मित्राला भेटण्यासाठी आला होता. यावेळी हालशुगरनजीक राष्ट्रीय महामार्ग पार करत असताना हा अपघात घडला. कार चालक सांगलीचा असून त्याने कार सोडून घटनास्थळावरून पळ काढला आहे.
बसवेश्वर चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस कार मालक व चालकाचा शोध घेत आहेत. संजीवकुमार वैजनाथ रॉय यांनी फिर्याद दाखल केली आहे.