महानगरपालिका महसूल विभागातील प्रकार : नागरिकांना करावी लागतेय धावपळ
प्रतिनिधी /बेळगाव
लॉग-ईनला 550 हून अधिक फाईल प्रलंबित असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या, त्यामुळे महापालिका आयुक्तांनी महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांना कारणे दाखवा नोटीस बजावून दोन दिवसात फाईल निकालात काढण्याची सूचना केली होती. पण महसूल उपायुक्तांनी याबाबत कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही. तसेच फाईलदेखील निकालात काढल्या नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिका महसूल उपायुक्तपदी अधिकारी मिळाला नसल्याने कामे रखडण्याची समस्या निर्माण झाली होती. पण तीन वर्षांपूर्वी या पदावर केएएस दर्जाच्या अधिकाऱयाची नियुक्ती करण्यात आली आहे. पण सदर अधिकारी फाईल निकालात काढत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांच्या पायातील चपला झिजल्या तरी फाईल निकालात काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे तत्कालीन आयुक्त जगदीश के. एच. यांनी देखील अनेकवेळा सूचना करून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामुळे नागरिकांची कामे झाली होती. पण सध्या पुन्हा ये रे माझ्या मागल्या… अशी स्थिती झाली आहे.
महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांच्या लॉग-इनला 550 हून अधिक फाईल प्रलंबित असून फाईल निकालात काढण्यासाठी मनपा अधिकाऱयांना विनविण्या केल्या, पण फाईल जैसे थे आहेत. त्यामुळे याबाबत मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱयांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. परिणामी दोड्डगौडर यांची बदलीदेखील झाली होती. पण त्यांनी केएटी लवादाकडे धाव घेऊन बदलीला स्थगिती घेतली होती. त्यानंतरही नागरिकांची कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे मनपा आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी महसूल उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावून दोन दिवसात स्पष्टीकरण देण्याची सूचना करून फाईल निकालात काढण्याचा आदेश बजावला होता. पण महसूल उपायुक्तांनी कोणतेच स्पष्टीकरण दिले नसल्याची माहिती उपलब्ध झाली असून नागरिकांच्या फाईल देखील निकालात काढल्या नाहीत. खातेबदलच्या फाईल निकालात काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही त्या निकालात काढण्यात आल्या नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.