प्रतिनिधी/ बेळगाव
रात्रीचे जेवण झाल्यानंतर फिरायला गेलेल्या महिलांना एका वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दोन महिला ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बेळगाव-बागलकोट मार्गावरील मुतगा येथे पोस्ट ऑफीसजवळ घडली.
विद्या भाऊसाहेब पाटील (वय 45) व सविता बाळकृष्ण पाटील (वय 47) दोघीही राहणार प्रभावती कॉलनी, मुतगा अशी त्यांची नावे आहेत. शांता कृष्णा चौगुले (वय 55) रा. मुतगा असे गंभीर जखमी महिलेचे नाव असून त्यांच्यावर केएलईएस प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विवेक भाऊसाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारिहाळ पोलिसांनी कारचालक युवराज अनंतराव जाधव, रा. बाळेकुंद्री खुर्द यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. युवराज भाजपा युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रात्रीचे जेवण झाल्यानंतर तीन महिला मुतगा येथे पोस्ट ऑफीसजवळ रस्त्याच्या बाजूने चालत जात होत्या. केए 22, झेड 3744 या क्रमांकाची ईको स्पोर्ट्स कार घेऊन युवराज बेळगावहून सांबऱयाकडे जाताना सदर महिलांना मागून जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, तिघीही महिला काही अंतर फरफटत जाऊन रस्त्यावर पडल्या.
अपघातानंतर जखमींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना विद्या व सविता यांचा वाटेतच मृत्यू झाला तर शांता चौगुले यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाहनचालकाने अपघातानंतर तेथे न थांबता पुढे जाण्याच्या प्रयत्नात मुतगा येथील एका दुकानाच्या कठडय़ालाही धडक दिली.
सविता पाटील यांच्या पश्चात पती, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे तर विद्या पाटील यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार असून दोघांचेही पती माजी सैनिक आहेत. सोमवारी दुपारी मुतगा येथे सविता पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत विद्या पाटील यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पती भाऊसाहेब पाटील हे केरळ येथे सेवेत आहेत. ते आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या प्रकरणी मारिहाळ पोलीस अधिक तपास करत आहेत.