प्रतिनिधी / कारवार
कोरोना महामारी दुसरी लाट अंतर्गत कारवार जिल्हय़ातील रुग्णांचा आलेख दिवसागणिक वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर प्रशासनाची डोकेदुखी वाढत चालली आहे. मंगळवारी कारवार जिल्हय़ात तब्बल 66 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना महामारीच्या दुसऱया लाटे अंतर्गत ही सर्वात अधिक नोंद आहे. दरम्यान मंगळवारी 14 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. समाधानाची बाब म्हणजे कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेअंतर्गत आजअखेर केवळ एक रुग्ण (ता. अंकोला) दगावला आहे. मंगळवारी नोंद झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये सर्वात मोठा वाटा (36) कारवार तालुक्यातील आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत कारवार तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या मोठी असल्याने कारवार तालुकावासियांची चिंता वाढली आहे. मंगळवारी अंकोला तालुक्यात 5, यल्लापूर आणि कुमठा तालुक्यात प्रत्येकी 3, होन्नावर, भटकळ, सिद्धापूर आणि मुंदगोड तालुक्यात प्रत्येकी दोन आणि हल्याळ तालुक्यात 11 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हय़ातील सक्रिय कोराना रुग्णांची संख्या 303 इतकी असून यापैकी 40 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 263 रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. जिल्हय़ातील आजअखेरच्या रुग्णांची संख्या 15 हजार 250, कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 14 हजार 758 इतकी तर दगावलेल्यांची संख्या 189 इतकी झाली आहे.