40 हजारांचे नुकसान : वीज उपकरणे व विद्यूत वाहिन्या जळून खाक
डिचोली/प्रतिनिधी
सध्या वीजेच्या लखलखाट आणि गडगडाटासह कोसळणाऱया पावसात मंगळ. दि. 5 ऑक्टो. रोजी रात्री 11 वा. च्या सुमारास कारापूर तिस्क साखळी येथील रमेश सावईकर यांच्या दुकानावर वीज कोसळल्याने त्यांचे सुमारे 40 हजारांचे नुकसान झाले. सुदैवाने या दुकानाबाहेर असलेल्या दोघांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.
दुकान बंद असताना रात्री वीजेचा लोळ या दुकानात घुसला. त्यामुळे दुकानातील सर्व विद्यूत वाहिन्या आणि वीज उपकरणे जळून खाक झाली. सदर घटना घडली त्यावेळी रात्री 11 वा. या दुकानाबाहेर दोन व्यक्ती होते. सदर अचानकपणे प्रकार घडताच भांभावलेल्या त्या दोघांनी दुकानाकडून धुम ठोकली. या घटनेची माहिती डिचोली अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर दलाच्या जवानांनी अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत स्थानिकांनी दुकानात लागलेली आग बऱयाचशा प्रमाणात विझवली होती. अग्निशामक दलाच्या जवानानी उर्वरीत आग विझवली.