शाहरुख खानने गेली अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केलेय ते मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने आणि अर्थातच स्वतःच्या टॅलेंटने. त्याचा इथे कुणीही गॉडफादर नसताना तो दिल्लीतून मुंबईत आला, हिरो होण्याचे स्वप्न पाहिले अन् तो केवळ हिरो नाही तर सुपरस्टार पदापर्यंत पोहोचला. आज ज्या बंगल्यात तो राहतोय ‘मन्नत’मध्ये तो आधी कुणा दुसऱयाचा बंगला होता. पण शाहरखने स्वप्न पाहिले की एक दिवस इथे आपण राहत असू अन् मग काय त्याने स्वतःच्या जोरावर ते करून दाखवले, एकदा शाहरुख एका मुलाखतीत म्हणाला होता, ‘मी माझा बंगला जिथे आहे त्याच्या अगदी समोरच्या रस्त्याला कठडय़ावर झोपायचो अन् एकटक बंगल्याकडे पाहायचो. मनात स्वप्न जागे ठेवायचो’.
काही वर्षांनतर मन्नतबाहेर शाहरुखची जागा कार्तिक आर्यनने घेतली. आता त्याला काही मन्नतमध्ये राहायचे वगैरे नव्हते तर त्याला फक्त शाहरुखला पहायचे होते, त्याच्यासोबत सेल्फी काढायचा होता. त्याने एका मुलाखती दरम्यान हा किस्सा शेअर केला. तो म्हणाला, ‘मला माहीत होते शाहरुख खान दर रविवारी बंगल्याबाहेर आलेल्या लोकांना, त्यांच्या चाहत्यांना हात दाखवतात. भेटतात. मीही दर रविवारी मन्नतबाहेर तासनतास उभे राहायचो अन् शाहरुख आला की त्याला डोळे भरून पाहायचो. एकदा तर सेल्फी काढण्याची संधीही साधली
अन् ताटकळत उभे राहणे फळास आले’.
आज कार्तिक स्वतः मोठा स्टार आहे. यंग क्राऊडसाठी हार्टथ्रोब आहे. खरेतर शाहरुखच्या रेडचिली सिनेमातून नुकताच कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवलाय. यामागे करण जोहर असल्याचे बोलले जातेय. पण कार्तिकने ठरवलेय कोणाच्या वाकडय़ात शिरायचे नाही, बोलायचे नाही फक्त काम करत रहायचे.