दुपारी 12 वाजून 47 मिनिटांनी दर्शनाला प्रारंभ , अंबाबाई मंदिराजवळील मंदिरात मुखदर्शन
प्रतिनिधी / कोल्हापूर
येत्या रविवारी (दि. 29) कार्तिक स्वामी जयंती आहे. दुपारी 12 वाजून 47 मिनिटांनी या जयंती सोहळ्याला प्रारंभ होत आहे. सोमवारी सकाळी 6 वाजता जयंतीची सांगता होणार आहे. अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळील कार्तिक स्वामी मंदिराच्या वतीने कार्तिक स्वामी जयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे. पारंपरिक पद्धतीने जयंती साजरी केली जात असली तरी स्वामींच्या दर्शनास मंदिराकडे हजारोंच्या संख्येने येणाऱया भाविकांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियम केले आहेत.
दरम्यान, रविवारी दुपारी साडे 12 वाजता मंदिरातील कार्तिक स्वामींची महापूजा बांधून मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल. मात्र भाविकांना मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन घेता येणार नाही. मुखदर्शन घेऊन त्यांना माघारी परतावे लागणार आहे. रात्री 10 वाजेपर्यंत दर्शन कार्य सुरू राहिलं. दुसऱया दिवशी म्हणजे सोमवारी पहाटे 4 वाजता मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले केले जाईल. सहा वाजेपर्यंत दर्शन कार्य सुरू राहिल. अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाच्या दिशेने दर्शनरांग लावली जाणार आहे. भाविकांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनास येताना सोबत मोरपिस, नाराळ, पेढे, फुले, प्रसादासह अन्य कोणतेही पुजेचे साहित्य घेऊन येऊ नये, असे आवाहन मंदिराचे पुजारी शांतीनाथ कदम यांनी केले आहे.