वृत्तसंस्था/ चेन्नई
न्यू इन चेस क्लासिक ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत विश्व विजेत्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने आघाडीचे स्थान राखले असून सलग दहाव्या सामन्यात तो अपराजित राहिला आहे.
त्याचा जवळचा प्रतिस्पर्धी हिकारु नाकामुराही दहा सामन्यात अपराजित राहिला असून इराणचा अलिरेझा फिरोझाही त्याच्या अगदी नजीक आहे. नाकामुराला पुन्हा फॉर्म गवसला असून कार्लसनला तो हरविण्याच्या बेतात होता. फिरोझाने दिवसातील दोन डाव जिंकले. कार्लसनने 10 पैकी 7 गुण घेतले असून नाकामुरा व फिरोझा त्याच्यापेक्षा फक्त अर्ध्या गुणाने मागे आहेत. कार्लसनने तीन डाव अनिर्णीत राखले तर आपल्याच देशाचा आर्यन तारी तसेच गवेन जोन्स यांच्यावर विजय मिळविले. मंगळवारपासून बाद फेरीचे सामने सुरू होणार आहेत.
अझरबैजानचा तैमूर रॅडजाबोव्हने चार डाव अनिर्णीत राखले तर एका डावात भारताच्या रमेशबाबू प्रज्ञानंदकडून पराभव स्वीकारावा लागला. कार्लसनपेक्षा तो एका गुणाने मागे आहे. प्रज्ञानंदला दिवसातील पहिले दोन सामने गमवावे लागले तर आठव्या फेरीत आपल्याच देशाच्या विदित गुजरातीला त्याने बरोबरीत रोखले आणि नंतर रॅडजाबोव्हवर मात केली. पण नंतर तारीकडून त्याला आणखी एक पराभव स्वीकारावा लागला.