फुरूस येथील दुर्घटना, दोघे जखमी
प्रतिनिधी/ खेड
खेड-दापोली मार्गावरील फुरूस येथील एस.आय. स्कूलसमोरच्या मार्गावरील नदीपात्रात वॅगनार कार उलटून झालेल्या अपघातात खैरूनिसा फरीद परकार (70, फुरूस) या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत.
जैनाबी कमरूद्दीन परकार (60), फरीद अहमद अली परकार (72, दोघेही फुरूस) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने उपचारार्थ नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. परकार कुटुंबिय विवाह सोहळय़ासाठी कारने निघाले होते.
फरीद परकार कार चालवत असताना अचानक कारवरील ताबा सुटून कार नदीपात्रात कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच ग्रामस्थांसह मदतकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलीस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली.