प्रतिनिधी / सातारा :
माण तालुक्यातील काळचौंडी गावात बंद बंगल्याच्या मागील बाजुचा दरवाजा उचकटून चोरटय़ांनी रोख रक्कम, दागिने असा एकूण 4 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि. 2 रोजी रात्री घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार किसन काशीनाथ माने (वय 50) रा. काळचौंडी, ता. माण यांचा बंगला 2 ते 3 ऑक्टोबर दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाट उघडून कपाटातील 76 हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. माने यांच्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या चोरीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे करत आहेत.