तरूण भारत इफेक्ट
वार्ताहर / कास
परळी विभागातील काळोशी गावाच्या वनहद्वीतील बेकायदेशीररीत्या तोडलेली सागवानाची झाडे अंबवडे बु. येथुन वनविभागाने ताब्यात घेतली असुन त्यासोबत वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल वाहन हत्यारे ताब्यात घेण्यात आली आहेत. सातारा वनविभागाच्या हाद्दीतील काळोशी गावालगतच्या वन हद्दीत काही दिवसांपुर्वी अज्ञाताने सागवानाची झाडे तोडुन पसार केल्याची माहीती समोर येताच दैनिक तरूण भारतने वृत्त प्रसिद्ध करून प्रकार उघडकीस आणला होता.
वनविभागाकडूनही वनगुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याचा तपास सुरु असताना हे सागवान अंबवडे बुद्रुक गावातील नितिन वसंत देशमुख ता. जि. सातारा यांनी तोडल्याची माहीती मिळताच वनविभागाने त्यांच्याकडुन सागवानाची लाकडे वाहन व हत्यारे जप्त करण्यात आली असुन पुढील तपास सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहीते. यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण व कर्मचारी करत असल्याची माहीती सातारा वनविभागाने दिली आहे.