पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन
वृत्तसंस्था/ वाराणसी
नव्यावर्षात भारतात जागतिक स्तरीय अदभूत क्रूज पर्यटन सुरू होणार आहे. उत्तरप्रदेशच्या वाराणसी ते बांगलादेशमार्गे आसामच्या डिब्रूगडपर्यंत जगातील सर्वात लांब नदी क्रूज सेवेला पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. ही लक्झरी क्रूज विदेशी पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. ही क्रूज 50 दिवसांच्या कालावधीत गंगा, भगिरथी, हुगळी, ब्रह्मपुत्रा आणि वेस्ट कोस्ट कालव्यासह 17 नद्यांमधील जवळपास 4,000 किलोमीटरचे क्षेत्र व्यापणार आहे.
काशी ते डिब्रूगढपर्यंत क्रूज पर्यटन भारताच्या वाढत्या क्रूज पर्यटनाचे प्रभावी उदाहरण ठरणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी म्हटले होते. क्रूज 50 प्रमुख पर्यटनस्थळांना व्यापणार असून यात काही ऐतिहासिक वारसास्थळे, वाराणसीतील प्रसिद्ध गंगा आरती तसेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि सुंदरबन डेल्टा यासारखे अभयारण्य सामील आहे. क्रूज बांगलादेशात सुमारे 1,100 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. क्रूजमध्ये पर्यटकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असतील अशी माहिती भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली आहे.
केंद्राने 100 राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. या जलमार्गांवर मालवाहतुकीसह विश्वस्तरी क्रूजसेवा पाहण्याचे लक्ष्य आहे. प्राचीन काळात व्यापार आणि पर्यटनासाठी जलमार्गांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत होता. याचमुळे अनेक मोठी शहरे ही नद्यांच्या काठावर वसलेली आहेत आणि तेथे औद्योगिक विकास झाला असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते.