सातारा वन विभागाची राजमाची येथे कारवाई
वार्ताहर/ कराड
राजमाची (ता. कराड) येथे कासव व मांडुळ विक्रीसाठी घेऊन आलेल्या चौघांना सातारा वन विभागाने अटक केली असून त्यांच्याकडून एक कासव, एक मांडुळ दोन दुचाकी व चार मोबाईल असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित साधू साठे (वय 20), प्रशांत रामचंद्र रसाळ (वय 20), अविनाश आप्पा खुडे (वय 21, तिघे रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व सुनील तानाजी सावंत (वय 28, रा. दिवड, ता. माण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी काही लोक कासव व मांडुळ हे वन्य प्राणी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळालेली होती. त्यानुसार वन विभागाने सापळा लावला होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून चौघेजण आले. राजमाची येथील हॉटेल सांज सावली येथे चौघेजण जेवण करीत असताना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने वन विभागाच्या अधिकाऱयांनी त्या चौघांची झडती घेतली असता एका पिशवीत जिवंत कासव व दुसऱया एका पिशवीत मांडुळ मिळून आले.
इंडियन सॉफ्ट शेल्ड टरटल (कासव) व कॉमन सॅनड बोआ (मांडुळ) हे प्राणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत शेडय़ुल 1 भाग 2 व शेडय़ुल 4 मध्ये येते. त्यानुसार या प्राण्यांना पकडणे, बाळगणे, विक्री करणे, मारणे हा वन्यजीव कायद्याने गुन्हा आहे. त्यानुसार या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना आटक करण्यात आली आहे. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, वनपाल ए. पी. सवाखंडे, बाबूराव कदम, वनरक्षक उत्तम पांढरे, विजय भोसले, रमेश जाधव, अरूण सोलंकी, सचिन खंडागळे, श्रीकांत चव्हाण, हणमंत मिठारे, सुनीता जाधव, दीपाली अवघड, शीतल पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. वन्य प्राणी कोणी पकडत असेल, विक्री करीत असले अथवा वन्य प्राण्याला कोणी मारत असेल तर 1912 या क्रमांकार गोपनीय माहिती कळवण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीन करण्यात आले आहे.