- मंगळवारी 51,880 नवे रुग्ण; 891 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. मात्र सोमवारच्या तुलनेत काल आढळलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत राज्यात 51 हजार 880 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 65 हजार 934 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सोमवारी ही संख्या 59 हजार 500 इतकी होती. तर 48, 621 नवे रुग्ण आढळून आले होते. सोमवारच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली असून हा फरक 3 हजार 259 इतका आहे.
दरम्यान, कालच्या दिवशी 891 जणांनी आपला जीव गमावला आहे. सोमवारी ही संख्या 567 इतकी होती. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 48 लाख 22 हजार 902 वर पोहचली आहे. यातील 41 लाख 07 हजार 092 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 71 हजार 742 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.16 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.49 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 41 हजार 910 रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 81 लाख 05 हजार 382 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48 लाख 22 हजार 902 (17. 16 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39 लाख 36 हजार 323 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर 30 हजार 356 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
- पुणे शहरात 63 मृत्यू
पुणे शहरात मागील 24 तासात 2 हजार 879 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 3,678 रूग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 33 हजार 089 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 7,054 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.