बॅसेलमधील स्वीस बॅडमिंटन लीग : डेन्मार्कच्या प्रतिस्पर्ध्याला नमवले
वृत्तसंस्था / बॅसेल
येथे सुरू असलेल्या स्वीस खुल्या सुपर 300 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतने एकेरीची उपांत्य फेरीत गाठताना डेन्मार्कच्या तृतीय मानांकित अँटोनसेनचा पराभव केला.
शुक्रवारी रात्री खेळविण्यात आलेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात के. श्रीकांतने अँटोनसेनचा 21-19, 19-21, 22-20 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. विश्व बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱया 7 व्या मानांकित श्रीकांतचा उपांत्य फेरीचा सामना इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीविरुद्ध होणार आहे. कोरोनावर मात केल्यानंतर श्रीकांतसाठी ही तिसरी स्पर्धा आहे. स्वीसच्या स्पर्धेत आता गुंटूरचा 29 वर्षीय के श्रीकांत तसेच एच.एस प्रणॉय आणि महिला विभागात पी.व्ही सिंधूने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.