सात्विक-अश्विनीचा इंडोनेशियन जोडीवर धक्कादायक विजय
वृत्तसंस्था/ बॅसेल, स्वित्झर्लंड
भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने आपल्याच देशाच्या समीर वर्माचे कडवे आव्हान परतावून लावत स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात केली. 2015 मध्ये श्रीकांतने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज-अश्विनी पोनप्पा यांनी इंडोनेशियन जोडीवर धक्कादायक विजय मिळवित आगेकूच केली आहे.
येथे चौथे मानांकन असलेल्या श्रीकांतने समीरवर तासाभराच्या खेळात 18-21, 21-18, 21-11 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. समीरनेदेखील ही स्पर्धा 2018 मध्ये जिंकली होती. जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानावर असणाऱया श्रीकांतची पुढील लढत फ्रान्सचा थॉमस रॉक्स किंवा कॅनडाचा झायोडाँग शेंग यापैकी एकाशी होईल.
मंगळवारी रात्री झालेल्या मिश्र दुहेरीच्या लढतीत भारताच्या सात्विकसाईराज रनकिरेड्डी व अश्विनी पोनप्पा यांनी जागतिक आठव्या मानांकित व येथे दुसरे मानांकन मिळालेल्या इंडोनेशियाच्या हाफिझ फैझल व ग्लोरिया इमॅन्युअली विडाजा यांना 21-18, 21-10 यांना असा पराभवाचा धक्का देत दुसरी फेरी गाठली. गेल्या जानेवारीत झालेल्या टोयोटा थायलंड ओपन सुपर 1000 स्पर्धेत सात्विक-अश्विनी यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्या स्पर्धेतही या इंडोनेशियन जोडीला त्यांनी नमविले होते. सात्विक-अश्विनी सध्या जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर असून विदेशी प्रशिक्षक मथायस बोए यांच्या मार्गदर्शनाखाली गेला महिनाभर ते सराव करीत आहेत. त्यांची पुढील लढत इंडोनेशियाची आणखी एक जोडी रिनोव रिवाल्डी व पिथा हनिंगत्यास मेंतारी यांच्याशी होणार आहे.
आणखी एक भारतीय जोडी प्रणव जेरी चोप्राला मिश्र दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. एन. सिक्की रेड्डीसमवेत खेळताना त्याला इंग्लंडच्या तिसऱया मानांकित मार्कस एलिस व लॉरेन स्मिथ यांच्याकडून केवळ 39 मिनिटांत 18-21, 15-21 अशी हार पत्करावी लागली. ऑलिम्पिक पात्रतेची मुदत 15 जूनपर्यंत वाढविण्यात आली असून त्यातील ही पहिली स्पर्धा आहे.