ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग-उन यांची प्रकृती हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर खालावली असून, त्यांच्या जीवाचा धोका वाढल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने काही अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. तर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनेही याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे.
मागील महिन्यात जोंग यांच्यावर हृदय आणि रक्तवाहिन्यांसंदर्भात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर कार्डीओवॅस्क्यलरमुळे (cardiovascular) उपचार सुरू आहेत. ते जास्त प्रमाणात धुम्रपान करत होते, तसेच त्यांना स्थुलतेचाही त्रास मागील ऑगस्ट महिन्यापासून जाणवत होता.
अकरा एप्रिल रोजी किम जोंग उन हे जनतेसमोर आले होते. त्यानंतर 15 एप्रिलला त्यांच्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातही ते सहभागी झाले नव्हते. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. किम जोंग उन यांच्यावर हयांगसान येथे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.