भारताने दर्शविली सहमती- अफगाणिस्तानवर चर्चा
वृत्तसंस्था/ बिश्केक
किर्गिस्तानच्या विकास प्रकल्पांसाठी 200 दशलक्ष डॉलर्सची मदत करण्यासाठी भारताने सहमती दर्शविल्याची माहिती विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी दिली आहे. जयशंकर यांनी बिश्केकमध्ये किर्गिस्तानचे विदेशमंत्री रुस्लान कजाकबायेव्ह यांच्यासोबत बैठकीत चर्चा केल्यावर ही माहिती समोर आली आहे.
कजाकबायेव्ह यांच्यासोबत सौहार्दपूर्ण आणि रचनात्मक चर्चा झाली आहे. विकास प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी 20 कोटी डॉलर्सच्या मदतीकरता सहमती झाली. उच्च प्रभाव असणाऱया संयुक्त सहभाग असलेल्या प्रकल्पांना कार्यान्वित करण्याप्रकरणी चर्चा झाल्याचे जयशंकर यांनी ट्विट करत सांगितले आहे.
भारतीय विद्यार्थ्यांच्या जलद प्रवासाची आवश्यकता आणि दोन्ही देशांदरम्यान अधिक उदार व्हिसा व्यवस्थेवरही जयशंकर यांनी बैठकीत चर्चा केली. तसेच संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याची सकारात्मक समीक्षा करण्यात आली आहे. भारत आणि किर्गिस्तान प्रजासत्ताकचा अफगाणिस्तानच्या विकासासाठी एक संयुक्त दृष्टीकोन असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
कजाकिस्तान सीआयसीए या फोरमचा अध्यक्ष आहे. जयशंकर हे कजाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि विदेशमंत्री मुख्तार तिलेबर्दी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच कजाकिस्तानच्या नेतृत्वाची भेट घेणार आहेत.
याचदरम्यान जयशंकर हे लवकरच आर्मेनियाच्या दौऱयावर जाणार आहे. भारताच्या कुठल्याही विदेशमंत्र्याचा स्वतंत्र आर्मेनियासाठीचा हा पहिलाच दौरा ठरणार आहे. आर्मेनियाच्या विदेशमंत्र्यांसह तेथील नॅशनल असेंबलीचे पंतप्रधान आणि अध्यक्षांची ते भेट घेणार आहेत.