हतबल न्यूझीलंडविरुद्ध पाचवी व शेवटची टी-20 आज, यजमान संघासमोर नामुष्की टाळण्याचे आव्हान
@ माऊंट माऊंगनुई / वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आज (रविवार दि. 2) पाचव्या व शेवटच्या टी-20 सामन्यात मैदानात उतरेल, त्यावेळी यजमान न्यूझीलंडचा व्हॉईटवॉश करणे, हेच त्यांच्यासमोरील मुख्य लक्ष्य असेल. न्यूझीलंडने एखाद्या द्विदेशीय टी-20 मालिकेत (तीन किंवा पेक्षा अधिक सामने) यापूर्वी एकदाही सर्वही सामने गमावलेले नाहीत. त्यामुळे, आज नामुष्की टाळणे, हे त्यांच्यासमारील मुख्य आव्हान असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 12.30 वाजता या लढतीला सुरुवात होणार आहे.
यापूर्वी फेब्रुवारी 2008 मध्ये न्यूझीलंडला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 0-2 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मालिकेत पुन्हा एकदा व्हॉईटवॉशच्या उंबरठय़ावर हा संघ फेकला गेला गेला. या मालिकाविजयामुळे भारताचे मनोबल उंचावले असले तरी आयसीसी टी-20 मानांकन यादीत मात्र भारताला याचा विशेष लाभ होणार नाही. भारतीय संघ यापूर्वीप्रमाणेच पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर पाचव्या स्थानी कायम असणार आहे.
मनोबल उंचावणारा मालिकाविजय
ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मात्र हा मालिकाविजय भारतासाठी मनोबल उंचावणारा ठरु शकतो. चौथ्या टी-20 लढतीत संजू सॅमसन व शिवम दुबे यांना खेळवत नव्या खेळाडूंना संधी देण्याचा प्रयोग भारताने राबवला व आजच्या लढतीतही त्याची पुनरावृत्ती अपेक्षित आहे.
सॅमसनला श्रीलंका व न्यूझीलंडविरुद्ध बढती मिळाली होती. शिवम दुबेकडे मात्र फिरकीपटू व जलद गोलंदाजांविरुद्ध खेळताना फूटवर्कचा अभाव दिसून आला आहे. मनीष पांडे सहावे स्थान निश्चित करण्याच्या दिशेने आगेकूच करत असून श्रेयस अय्यरला तिसऱया स्थानी बढती मिळू शकते. फलंदाज-यष्टीरक्षक जागेबद्दलच आता फक्त प्रश्न बाकी आहे.
पंतला आजमावणार का?
घरच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपासून केएल राहुल सातत्याने ही दुहेरी भूमिका बजावत आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतही तोच यष्टीरक्षण करेल, असे विराटने यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे, त्यापूर्वी त्याला विश्रांती देत ऋषभ पंतला पुन्हा एकदा आजमावण्याचा पर्याय भारताकडे उपलब्ध असेल.
न्यूझीलंडविरुद्ध ही मालिका झाल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीनंतर आयपीएल होत आहे व त्यानंतर लंकेविरुद्ध टी-20 मालिका होईल. पण, यासाठी बराच अवधी असल्याने पंतसाठी आशाअपेक्षा धुसर होत चालल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
यापूर्वी, वेलिंग्टनमधील चौथ्या टी-20 लढतीत रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर आजच्या लढतीत विराटला विश्रांती दिली जाईल व रोहित नेतृत्वाची धुरा सांभाळेल, असे संकेत आहेत. गोलंदाजीत जसप्रित बुमराहला विश्रांती देत शमीकडे मुख्य भार असेल, अशी चिन्हे आहेत. यजमान न्यूझीलंडचा संघ या लढतीत तरी मानसिक दडपण झुगारुन पराभवाचा दुष्काळ संपुष्टात आणणार का, इतकीच आज उत्सुकता असेल.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टील, रॉस टेलर, स्कॉट कग्लेईन, कॉलिन मुन्रो, टॉम बुस, डॅरेल मिशेल, मिशेल सॅन्टनर, टीम सेफर्ट (यष्टीरक्षक), हमिश बेनेट, ईश सोधी, टीम साऊदी, ब्लेयर टिकनर.
सामन्याची वेळ : दुपारी 12.30 पासून.