प्रतिनिधी / बेळगाव
कुंदकला या संस्थेच्या पुढाकाराने व आविष्कार या संस्थेच्या सहकार्याने दि. 25 व 26 रोजी आनंद वर्कशॉप विजयनगर हिंडलगा येथे निवडक महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य असून दर चार महिन्यांनी अशी कार्यशाळा होणार आहे.
बेळगावमध्ये अनेक वर्षे राहिलेल्या उत्तम चित्रकार कुंदा किर्लोस्कर यांना महिलांनी आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी व्हावे, असे नेहमीच वाटत असते. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्या कन्या पूर्णिमा किर्लोस्कर-सैनी यांनी ही संस्था सुरू केली आहे.
कुंदाताई किर्लोस्कर यांचा जन्म मुंबईचा. त्यांनी बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण घेतले. म्हैसूरच्या संग्रहालयात हातात दिवा धरलेल्या महिलेचे जे प्रसिद्ध चित्र आहे, ते चित्र रेखाटणारे एस. एल. हळदणकर हे कुंदाताई यांचे गुरु होत. चित्रकलेसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. आनंद किर्लोस्कर यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या बेळगावला आल्या. दृष्टी विकारामुळे काही वर्षे त्यांना चित्रे काढणे जमले नाही.
पुढे 2017 मध्ये लंडनमध्ये असताना त्या आजारी पडल्या, तेव्हा कन्या पूर्णिमा यांनी आभाराची शुभेच्छापत्रे तयार करण्याची कल्पना सुचविली. पुढे त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन लंडन येथे भरविण्यात आले. मुलीसमवेत काम करत कुंदाताई यांनी महिला आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होतील यासाठी प्रयत्न केले. त्यातूनच कुंदकलाची निर्मिती झाली. कुंदाताईंच्या कलाकृतींचा वापर करून ऐपरन, स्कार्फ, नॅपकीन अशा वस्तू तयार करण्यास सुरुवात झाली.
आज पूर्णिमा कुंदकलाचे काम पाहत असून वस्तू तयार करण्यासाठी लागणारा निधी जमा करून उभारण्यात येतो. स्थानिक सेवाभावी संस्थेतर्फे गरजू व काम करण्यास पात्र अशा महिलांची माहिती घेतली जाते. यानंतर दोन दिवसांची कार्यशाळा घेऊन महिलांना हे काम शिकविले जाते. प्रशिक्षण घेतलेल्या महिला कुंदकलाच्या विविध वस्तू तयार करतात, ज्याची भारतात व इंग्लंडमध्ये विक्री होते. विक्रीतून व देणगीतून आलेला पैसा नवीन वस्तू बनविण्यासाठी वापरला जातो.
बेळगावशी कुंदाताईंचे असलेले नाते लक्षात घेऊन दि. 25 व 26 रोजी ही कार्यशाळा बेळगावमध्ये होत आहे. आविष्कारतर्फे पाच महिलांची निवड करण्यात आली आहे. दि. 25 रोजी सकाळी 11 वाजता इनरव्हीलच्या माजी चेअरमन लता कित्तूर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.