प्रतिनिधी /कुंभारजुवे
कुंभारजुवे मतदारसंघातील आठ आजी-माजी सरपंच, विद्यमान पंच तसेच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱयांनी काल मंगळवारी धुळापी खोर्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तृणमूल काँग्रेस पक्षात करुन येत्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात तृणमूलचे उमेदवार समील वळवईकर यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय नेते कीर्ती आझा, स्थानिक नेते किरण कांदोळकर यांनी या सर्व सदस्यांना पक्षाची शाल व झेंडा देऊन त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी समील वळवईकर तूम आगे बढे हम तुम्हारे साथ है, आणि तीन फुलांचो काळ गोंयची नवी सकाळ अशा घोषणा देण्यात आल्या.
पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये दिवाडी बेटावरील सां मातियश पंचायतीचे माजी सरपंच प्रशांत हरवळकर, सांत मातियशच्या विद्यमान पंच व माजी सरपंच सौ. आशा पै, विद्यमान पंच व माजी सरपंच सदानंद फडते, पंच सौ. संगीता हरवळकर, कुंभारजुवा काँग्रेस गट समितीचे माजी खजिनदार लक्ष्मीकांत पै, कुंभारजुवा काँग्रेस गट समितीचे मिनिनो पिंटो, शेखर केसरकर दिवाडी, अशोक चोपडेकर दिवाडी यांचा समावेश आहे.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना समील वळवईकर यांनी सांगितले की या आठ जणांनी आपल्या समर्थकांसह तृणमूलमध्ये प्रवेश केल्याने कुंभारजुव्यात पक्ष आणखी मजबूत झाला आहे. यापुर्वी अनेकांनी आपल्या समर्थकांसह प्रवेश केला आहे. येत्या काळात अनेक नेते पक्षा सहभागी होणार आहेत. मतदारसंघातील सर्व पंचायतींमध्ये उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याने पक्षाचा विजय नक्की झाला आहे.