समाजसेवक राजेश फळदेसाई यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पणजी
कोंचावाडा कुंभारजुवे येथील श्री रामपुरुष युवा मंडळ आयोजित शारदोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंडळाच्या सदस्यांनी दिवसरात्र काम करुन सुंदर सजावट केली होती. सगळय़ा वाडय़ावरच्या लोकांनीही मोठय़ा प्रमाणे मदत केली.
शारदोत्सवाच्या दुसऱया दिवशी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये संजिता नार्वेकर प्रथम, दक्षता गावस दुसरे, तर हर्षदा गावडे हिला तिसरा क्रमांक मिळाला. दिविशा कुंभारजुवेकर, समिता खांडेपारकर, नविता खांडेपारकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली.
तिसर्या दिवशी खास आमंत्रित श्री साई दामोदर आरती मंडळ मडगांव यांनी सुंदर सादरीकरण केले. मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांची प्रशंसा केली. यावेळी संगीत खुर्ची स्पर्धाही घेण्यात आली. बक्षीस वितरण सोहळय़ाला कुंभारजुवे मतदारसंघातील समाजसेवक तथा उद्योजक राजेश फळदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. ते पुढे म्हणाले की कोणतीही संस्था स्थापन करून ती चालविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. श्री रामपुरुष युवा मंडळाने चांगले कार्य चालविले असून त्यातून आपल्या कला व संस्कृतीचे जतन होत आहे. म्हणून या मंडळाला यापुढेही आपण सर्व मदत करणार आहे.
यावेळी अंगणवाडी शिक्षिका प्रतिमा फडते व वंदना फडते, समीर नाईक, सुभाष नार्वेकर, शुभम कुंकळकर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात प्रशांत नार्वेकर यांनी सुंदर गणेश श्लोक सादरीकरणाने केली. फळदेसाई यांच्या हस्ते प्रतिमा फडते व वंदना फडते तसेच समीर नाईक यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिमा फडते, वंदना फडते व समीर नाईक यांनी मनोगते व्यक्त केली. विविध स्पर्धांतील विजेत्यांना रोख बक्षिसे, चषक, पदके तसेच प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन सुरज रमेश नार्वेकर यांनी केले. शुभम कुंकळकर यांनी आभार मानले. नंतर रामपुरुष आरती मंडळाने सुंदर आरती सादरीकरण केले. त्यानंतर गाराणे, तीर्थ प्रसाद झाला. फुगडी तसेंच संगीताच्या तालावरील मिरवणुकीने सरस्वती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.