प्रतिनिधी /तिसवाडी
कुंभारजुवे मतदारसंघातील लोकप्रिय डॉक्टर तसेच भाजपचे पदाधिकारी डॉ. विनोद वेरेकर यांना येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने कुंभारजुवे मतदारसंघात उमेदवारी द्यावी, अशी मागणी मतदारसंघ गट समितीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि त्यांच्या चाहत्यांकडून होत आहे.
भाजप उमेदवारीच्या यादीत विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांच्यासह केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक यांचे पुत्र सिद्धेश तसेच डॉ. विनोद वेरेकर यांची नावे आहेत. उमेदवारी कुणाला द्यावी, याबाबत सर्वे सुरु असल्याने पक्षाने कुणालाच उमेदवार म्हणून काम करण्यास सांगिलेले नाही. मात्र पक्षाने या खेपेस लोकप्रिय, मनमिळाऊ, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणारे, सामाजिक बांधिलकी बाळगून डॉक्टरी सेवा देणारे डॉ. वेरेकर यांना संधी द्यावी, असे निवेदन कार्यकर्त्यांनी दिले आहे.
डॉ. वेरेकर हे 1996 पासून भाजपचे सदस्य आहेत. कुंभारजुवे मंडळ समितीचे उपाध्यक्ष असून कोविड स्वयंसेवक प्रशिक्षण मोहिमेचे उत्तर गोवा जिल्हा समन्वयक म्हणूनही ते जाबाबदारी सांभाळत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे ते सदस्य आहेत. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी अनेक आरोग्य शिबिरे आयोजित करुन लोकांना त्याचा लाभ मिळवून दिला आहे. गेली 38 वर्षे ते करमळी व माशेल येथून लोकांना डॉक्टरी सेवा देत आहेत. कुंभारजुवे मतदारसंघातील कुंभारजुवेसह सांतइस्तेव्ह, खोर्ली, करमळी, ओल्ड गोवा, दिवाडी परिसरातील रुग्णांना सेवा देत आहेत. कोरोना काळातही त्यांनी लोकांना डॉक्टरी सेवेबरोबरच मास्क, सेनिटायझरचे वितरण केले. कुंभारजुवे मतदारसंघात त्यांचा लोकसंपर्क मोठा असल्याने त्याचा लाभ निवडणुकीत मतांमध्ये होऊन भाजपला विजय मिळेल, असा विश्वास वेरेकर यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.