दोन लाखाचा ऐवज जप्त : ओल्ड गोवा पोलिसांनी केली कारवाई
प्रतिनिधी / पणजी
कुंभारजुवे येथील दोन ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणात ओल्ड गोवा पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमंतीचा ऐवज जप्त केला आहे. संशयितांच्या विरोधात भादंसं 454 व 380 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. संशयितांना आज रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये गौतम फडते (21), निखील पागी (25), रफिक नादफ (19) यांचा समावेश आहे. कुंभारजुवे येथे दोन ठिकाणी झालेल्या चोरीत सुमारे 3 लाख 56 हजार 300 रुपये किमंतीचा ऐवज लंपास केला होता. सुरुवातीस ओल्ड गोवा पोलिसांनी अज्ञात संशयितांच्या विरोधात तक्रारी नोंद करून तपास कामाला सुरुवात केली होती.
कुंभारजुवे येथील संध्या फडते यांच्या घरात शिरून सुमारे 1 लाख 85 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने पळविले होते. त्याबाबत संध्य फडते यांनी तक्रार दाखल केली होती. संशयितांनी भर दुपारच्यावेळी मुख्यदरवाजातून घरात प्रवेश केला व सोन्याचे दागिने लंपास केले होते. दुसऱया चोरी प्रकरणात व्हिक्टर डिमेलो यांनी तक्रार दाखल केली होती. 1 लाख 71 हजार 300 रुपये किमंतीचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले होते. घरात कुणी नसल्याचे पाहून घराची कौले काडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला व ऐवज लंपास केला होता असेही तक्रारीत म्हटले होते. ओल्ड गोवा पोलिसांनी दोन्ही चोरीप्रकरणाचा पंचनामा केला होता. ओल्ड गोवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.