चिपळूण
कत्तलीच्या उद्देशाने कराडच्या दिशेने बोलेरो गाडीतून 6 गुरे वाहतूक करणाऱयास खेर्डीतील दोन जागरूक नागरिकांनी कुंभार्ली घाटात पकडून अलोरे-शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी बोलेरो चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याचा साथीदार पळून गेला आहे.
नीलेश चव्हाण (शिरगाव-चिपळूण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. घाटमाथ्याला जोडणाऱया कुंभार्ली घाटातून तो बोलेरो गाडीतून कराडच्या दिशेने 6 गुरांची वाहतूक करत होता. ही माहिती खेर्डीतील नागरिक इकबाल खेरटकर व मुबारक खेरटकर या काका-पुतण्यांना समजल्यानंतर त्यांनी ही बेकायदा होणारी वाहतूक रोखण्याच्यादृष्टीने शनिवारी पहाटे 4च्या सुमारास कुंभार्ली घाटात कराडच्या दिशेने जाणारी बोलेरो गाडी थांबवून चालकाकडे चौकशी केली. यावेळी चालकाने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी गाडीत पाहिले असता त्यात गुरे आढळून आली. यानंतर त्यांनी चालक नीलेश चव्हाण यास पकडले. मात्र त्याच्यासमवेत असलेल्या नितीन चव्हाण याने तेथून पळ काढला.
यानंतर मुबारक खेरटकर यांनी तत्काळ अलोरे-शिरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येत नीलेश चव्हाण याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी बोलेरो गाडीसह 6 गुरे जप्त केली. या गुरांना खेड येथील गोशाळेत नेण्यात आले. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बिरुदेव कोळेकर करत आहेत. गुरे वाहतुकीची गाडी पकडून देणाऱया इकबाल व मुबारक खेरटकर यांचे विशेष कौतुक होत आहे.